मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील सर्व शिवजंयती उत्सव मंडळाची बैठक घेण्यासह यंदाची शिवजंयती आणि चित्ररथ मिरवणूक शांततेत आणि मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवजंयती उत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी विविध सूचना यावेळी मांडल्या.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक जत्तीमठ येथे आयोजित करण्यात आली होती. दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवजयंती उत्सव मंडळाला शंभर वर्षे होत असल्याने कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नेतेमंडळींना निमत्रंण देण्याची सूचना प्रकाश मरगाळे यांनी मांडली. तसेच स्वागत समिती स्थापन करून विविध उपक्रम राबविण्याची सूचना केली. कोरोना कालावधीत शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. पण यंदा हा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवेच. मात्र शांततेत आणि सर्वांचे लक्ष वेधणारे चित्ररथ तयार करण्यासाठी मंडळांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना महादेव पाटील यांनी मांडली.
यंदाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बीचा वापर टाळावा, तसेच पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आदर्शवत देखावे सादर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच शांततेत आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यासाठी म. ए. समिती युवा आघाडी प्रयत्नशील असेल, असा विश्वास युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केला. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ आणि मध्यवर्ती उत्सव महामंडळामध्ये समन्वय नसल्याने नियंत्रण ठेवण्यास अडचण होते. यामुळे सर्व महामंडळांच्यावतीने सर्व मंडळांच्या पदाधिकाऱयांची व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्याची गरज आहे. तसेच एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी मंडळाचा समन्वय आवश्यक असल्याचे मत माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी मांडले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी आहे. त्यामुळे ही मागणी चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात यावा, अशी सूचना सचिन जुटेकर यांनी केली. याप्रसंगी दीपक हळदणकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. तसेच मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.