ऑनलाईन टीम / मुंबई :
तमाम मराठी जनांचे प्रेरणास्रोत, हिंदवी स्वराज्यसंस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी ह्यांची शिवजयंती!
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न दाखवून राम-कृष्णाच्या, थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत. समान न्याय कसा करायचा, अपराध्याला कठोर शिक्षा कशी द्यायची ह्याचे धडे देत. ह्या सर्वांचा परिणाम म्हणूनच खूप कमी वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले.
अशा जिजाऊ च्या छत्रछायेत घडणारे मातृभक्त, संस्कारी, थोर, महान आणि शूर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम..!
प्रत्येक मराठी हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळं प्रेम, आदर, निष्ठा असते. अगदी कलाकारांच्याही मनात एक वेगळाच हळवा कप्पा असतो महाराजांबद्दल. म्हणूनच तर शाहिरांना पोवाडे स्फुरतात, लोककलांचा जागर होतो, कोणी चित्रकृती काढतो, कोणी असामान्य कलेतून महाराजांना मानवंदना देतो.
असाच एक प्रयत्न ह्या शिवजयंतीला शिवजन्मभूमीतीलच एक शिवकन्या “कु. स्मिता रामदास ढोबळे” हिने केला. माँसाहेब जिजाऊ आणि शिवजन्माचे एक आगळेवेगळे फोटोशूट आणि विडिओशूट शिवजयंती निमित्त तमाम महाराष्ट्रासमोर आणले. बरं हे केवळ फोटोशूट न्हवते तर प्रेरणा होती शिवसंस्कारांची, शिवविचारांची! “
“शिवजयंती शिवसंस्काराची” ह्या संकल्पनेतून तिने आताच्या पिढीमध्ये शिवसंस्कारांची जनजागृतीच एकप्रकारे केली. ह्यासाठी तिला साथ लाभली ती दोन गोड छोट्या शिवभक्तांची कु. श्रेया सचिन शिवलकर आणि कु. ईरा संकेत कदम यांची.
तसेच ही संकल्पना कु.स्मिता रामदास ढोबळे यांच्या मातोश्री सौ. नयना रामदास ढोबळे यांची होती.त्याचप्रमाणे जिजाऊ आणि बालशिवबांचे अप्रतिम, राजेशाही असे छायाचित्रण केलय कु. प्रणित मांजरेकर ह्यांनी. तसेच सुंदर आणि राजेशाही रंगभूषा आणि केशभूषा ही कु. निशा धनावडे यांनी सांभाळली.
ह्या छायाचित्रणाचे वैशिष्ट्य असे की महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवप्रेमी, शिवभक्त पेजेसनी ह्यातील प्रत्येक छायाचित्र आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक प्रसिद्ध केला. विविध सामज माध्यमांच्या सर्वच स्तरातून ह्या छायाचित्रणाला उत्तम प्रतिसाद आणि हजारोंनी (लाईक्सनी) पसंत दर्शवली..
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्याच मुली म्हणजेच जिजाऊंच्या लेकीचं जणू होत्या.
आणि ह्या लेकींनी आयाबहिणींच्या अब्रूचे रक्षण करणाऱ्या आपल्या जाणत्या राजाला दिलेली ही मानवंदना होती.
लोकांचे प्रेम, महाराजांवरची श्रद्धा आणि शिवविचार हे नेहमीच पुढेही अजून अशाच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची ऊर्जा देत राहतील..जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय महाराष्ट्र !