ऑनलाईन टीम / पुणे :
शिवजयंतीला कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत, मिरवणूक न काढता शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शुक्रवारी ( दि. 19) सकाळी 9 वाजता लालमहाल येथील जिजाऊ मॉं साहेब व शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन, जिजाऊ मॉं साहेब – शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलित करुन आणि एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाला पुष्पहार व हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 100 स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे दरवर्षीचे वैशिष्टय असते. यंदा मात्र, शासनाने दिलेल्या निर्देशाचा सन्मान राखत यावेळेस मिरवणूक न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मिरवणुकीच्या ऐवजी प्रथेपरंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी होणार आहे. सोहळ्याचे यंदा 9 वे वर्ष आहे.
सोहळ्याचे आयोजन समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, दीपक घुले, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.
दरम्यान, शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर सकाळी 11 वाजता, सलग 10 व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन ईशान अमित गायकवाड मानवंदना देणार आहेत. यावेळी ईशानच्या सोबत आई रिंकल व वडिल अमित सुरेश गायकवाड, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करणारी ईशानची आत्या सुषमा संजय शिंदे तसेच पलाश शिंदे, रितीका जुनावणे, हंसीका जाधव, रेवा जोगदंड, शूर गायकवाड, वीरा गायकवाड, तन्वी दळवी, सिध्दी दळवी हे देखील हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.