प्रतिनिधी / सातारा :
राजधानी सातारच्या शिवतीर्थ येथे ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्यात आहे. मात्र, त्याचबरोबर शिवतीर्थ परिसराची मुख्य नाळ असलेले ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसराची नियोजित आराखडय़ानुसार काम करावे, अशी मागणी धर्मवीर युवा मंचने केली आहे. काम सुरू करताना मुजोर सब ठेकेदाराने विटेमध्ये काम करण्याचा डाव नियोजला होता. परंतु धर्मवीर युवा मंचने खडे बोल सूनवताच कामाला व्यवस्थित सुरुवात झाली आहे. दरम्यान बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
शहरातीले महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ग्रेड सेपरेटरच्या कामाकडे पाहिले जाते. हे काम पुर्णतःवाच्या मार्गावर आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना देताच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी करुन सूचना दिल्या. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ही कामाची पाहणी केली असून कामाला गती आली आहे. प्रत्यक्ष मेघ डंबरीचे काम हाती घेतले असून त्या कामामध्ये सुरुवातीला सब ठेकेदाराने कसेबसे करण्याचा डाव आखला होता. ही बाब जेव्हा धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी हे काम नियोजित आराखडय़ानुसार व्हावे, अन्यथा काम होऊ देणार नाही असे बजावले. त्यावर त्या ठेकेदाराने नमते घेत काम चांगले करणार असल्याचे सांगण्यात आले. या कामाकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष असून प्रशांत नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.