प्रतिनिधी\ सातारा
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्राने तसेच तुतारीच्या निनादात वातावरण शिवमय झाले होते. पुष्पवृष्टीचा सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरमधून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शिवचरित्राचा सर्व परिसर भगवे झेंडे लावून सजवण्यात आला होता. मावळ्यांच्या वेशात तुतारी धारकांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रराजे यांचे आगमन होताच त्यांचे अनोखे स्वागत केले. तसेच ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र ही जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राजूभैय्या भोसले, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, भालचंद्र निकम, अमोल मोहिते, शेखर मोरे पाटील, बाळासाहेब महामुलकर, रवी पवार, शकील बागवान, अशोक मोने, महेश जगताप यांच्यासह शहरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शिवेंद्रराजे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. सर्व परिसर शिवमय असा झाला होता.