छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनेचा तीव्र निषेध
कोल्हापूर / प्रतिनिधी
बंगळूरातील सदाशिवनगर परिसरात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. कोल्हापूरातही घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येऊन विटंबना करणाऱ्या कानडी गुंडाला तत्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी केली. त्वरीत कारवाई न केल्यास महाराष्ट्रात येणाऱ्या कानडी बस रोखून कर्नाटकी उद्योग व्यवसाय बंद केले जातील असा इशारा दिला.
अखिल भारतीय मराठा महासंघासह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप, सेवाव्रत प्रतिष्ठानसह सर्वपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी बंगळूर येथील घटनेचा तीव्र निषेध केला. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगवे ध्वज हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, कानडी गुंडांचा धिक्कार असो, समाजकंटकांना अटक झालीच पाहीजे आदी घोषणा देण्यात आल्या. एक तासाहून अधिक काळ निषेध आंदोलन करण्यात आले. याचवेळी मिरजकर तिकटी येथे काँग्रेसच्यावतीने कन्नड वेदिकेच्या ध्वजावर काळी शाई ओतून दहन करण्यात आले. तर सेवाव्रत प्रतिष्ठानच्यावतीने संत बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापुरुषांचा आदर राखा असा संदेश दिला. पुतळ्याचे शुद्धीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवप्रेमींना दुग्धाभिषेक घालण्यास कर्नाटक सरकारने परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. कर्नाटक सरकारने समाजकंटकास तत्काळ अटक करावी, अन्यथा कोल्हापूरातील कानडी उद्योग, व्यापार बंद करून त्यांच्यासाठी कोल्हापूरात प्रवेशबंदी केली जाईल. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या कानडी बसची वाहतूक बंद केली जाईल, असा इशारा निषेध आंदोलनामध्ये व्यक्त करण्यात आला
आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, महेश जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अशोक देसाई, शारंगधर देशमुख, अशोक माळी, कादर मलबारी, बाबा जाफर, आपचे संदीप देसाई, मोहन हजारे, कुमार काटकर, मराठा महासंघाचे अवधूत पाटील, शैलजा भोसले, शशिकांत पाटील, उत्तम जाधव,मनसेचे राजू जाधव, विजय करजगार, शाहिर दिलीप सावंत, मिलिंद पाटील, बाळासाहेब भोसले, सुरेश कुऱहाडे आदींसह शहरातील नागरिक सहभागी झाले होते.
शहर काँग्रेसच्यावतीने मिरजकर तिकटी येथे कन्नड वेदिकेच्या ध्वजावर कुत्रे बसवून, त्यावरती कोल्हापूरी चपला ठेवण्यात आल्या.त्यानंतर ध्वजावर काळी शाई ओतून त्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मिरजकर तिकटी येथे थांबलेल्या कर्नाटक पोलीसांच्या गाडीसमोर जाऊन कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.