बसस्थानकावरील शिवपुतळय़ाला दुग्धाभिषेक : समाजकंटकांविरोधात घोषणाबाजी
वार्ताहर /जांबोटी
बेंगळूर येथे गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ावर समाजकंटकांनी शाई ओतून त्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी जांबोटी गावातील व बसस्थानक परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी निषेध केला. यावेळी बसस्थानकावरील शिवपुतळय़ाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर बेंगळूर येथे समाजकंटकांनी शाई ओतून त्याची विटंबना केल्यामुळे जांबोटी परिसरातील नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱया समाजकंटकांच्या विरोधात शिवप्रेमी नागरिक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते पेटून उठले असून शनिवारी सकाळी जांबोटी येथे या निंद्य घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रारंभी जांबोटी बसस्थानकावरील अश्वारुढ शिवपुतळय़ाला श्रीमंत सरकार करणसिंह सरदेसाई, जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जांबोटी शाखाप्रमुख मनोहर गोवेकर, मिथून कुंभार यांनी दुग्धाभिषेक केला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा राज्य कार्यदर्शी धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, जांबोटी ग्रा.पं. सदस्य सुनील देसाई, म. ए. समिती युवा कार्यकर्ते दामोदर नाकाडी, एपीएमसी माजी सदस्य संजय पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ओलमणीचे उपाध्यक्ष राजू चिखलकर यांची बेंगळूर येथील घटनेचा निषेध करणारी भाषणे झाली.
सरकारने दक्षता घेण्याची मागणी
हे घृणास्पद कार्य करणाऱया समाजकंटकांवर त्वरित कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी. यापुढे अशा घटना घडू नयेत याची सरकारने काटेकोर दक्षता घ्यावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी तसेच समाजकंटकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जांबोटी ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ मुतगी, सूर्यकांत साबळे, पिंटू नावलकर, मदन महाराज कणगुटकर, सचिन कुडतुरकर, विजय कुरलेकर, राजू कुरलेकर, नारायण कालमणकर, निंगाप्पा पाटील, प्रमोद देसाई, संतोष शिंदे, विठ्ठल राजगोळकर, व्यंकट पाटील, दौलत कोलीककर, ग्रा. पं. सदस्य काशिनाथ शिवणगेकर यांच्यासह परिसरातील शेकडो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.