इच्छुक नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी साहित्य तसेच निधी आपापल्या विभागातील विभाग प्रमुखांकडे जमा करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
महापूरामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांचे संसार कोलमडून गेले आहेत. अशा पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवप्रतिष्ठानच्या बेळगाव शाखेच्यावतीने पूरग्रस्तांना मदत पोहोचविली जाणार आहे. या मदत केंद्राला मंगळवारी अनसूरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात सुरुवात करण्यात आली.
2019 मध्ये देखील अशीच पूरस्थिती आली होती. त्यावेळीही शिवप्रतिष्ठानने पूरग्रस्तांना मदत केली होती. याच धर्तीवर यावषीही भिडे गुरूजींच्या आदेशानुसार निधी तसेच साहित्य संकलन करून ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविले जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी साहित्य तसेच निधी आपापल्या विभागातील विभाग प्रमुखांकडे जमा करावा, अशी माहिती जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी दिली.
छत्रे गुरूजी व व्यापारी मोहन बेळगुंदकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत शुक्रवार पर्यंत छत्रेवाडा येथे मदत स्वीकारली जाणार आहे. शनिवारी हे सर्व साहित्य व मदत गुरूजींच्या मार्गदर्शनाने पूरग्रस्तांना देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी परशराम कोकीतकर, विश्वनाथ पाटील, अजित जाधव, कल्लाप्पा पाटील, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, अंकुश केसरकर, किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, प्रवीण मुरारी, हिरामणी मुचंडीकर, निरंजन जाधव, अतुल केसरकर, पद्मप्रसाद हुली, गजानन पाटील, प्रमोद चौगुले, गजानन निलजकर, सागर पवार, राम पिंगट, मोहन पिंगट, गजानन बाडीवाले, नितीन कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.