प्रतिनिधी/ बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने शनिवारी शिवजन्मोत्सव साधेपणाने घरीच साजरा करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी आपल्या स्वगृही शिवछत्रपतींच्या पुतळय़ाचे पूजन करून शिवोत्सव साजरा केला. यापूर्वीच धारकऱयांनी आपापल्या घरीच शिवजयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन किरण गावडे यांनी केले होते. यानुसार संघटनेच्या धारकऱयांनी शिवरायांचा जन्मसोहळा साजरा केला.
कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाल्याने असंख्य जण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा गरीब आणि गरजूंना धारकऱयांनी शिवोत्सवात होणारा खर्च टाळून आपापल्या विभागात मदतकार्य राबवावे, असे आवाहन शिवजयंतीनिमित्त किरण गावडे यांनी केले आहे.