प्रतिनिधी / बेळगाव
चैत्र शुद्ध षष्टीयुक्त सप्तमीच्या प्रथम लहरी जोतिबा बटू रुपात प्रकट झाले. त्यामुळे येथील शिवबसवनगरमधील जोतिबा मंदिरात रविवार दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता महाअभिषेक करून श्रींची बटूचतुर्भुज रुपात पूजा बांधण्यात आली होती. सकाळी पाद्यपूजा, काकड आरती, महाआरती करण्यात आली. त्यानंतर दवणा अर्पण करून भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रींची बटूचतुर्भुज रुपातील पूजा लक्ष्मण बुणे आणि मयुरेश गोडसे यांनी बांधली होती. येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मंदिरात जोतिबा प्रकटदिन सोहळा पार पडला. यावेळी सकाळी 6.21 वाजता देवाला पाळण्यात घालून शास्त्रपूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता सचिन जोशी भटजी यांच्या हस्ते अभिषेक झाला. दुपारी 12 वाजता महाआरती करून भक्तांना प्रसादाचे वाटप केले. रात्री आठ वाजता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती करून या सोहळय़ाची सांगता करण्यात आली.
जोतिबाचा चैत्र उत्सव 23 पासून
येत्या 23 एप्रिलपासून जोतिबाचा चैत्र उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दि. 23 एप्रिल रोजी कामदा एकादशीदिवशी देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात येणार असून दि. 24 एप्रिल द्वादशीदिवशीला पत्तीर भरण्यात येणार आहेत. रविवार दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करून सोमवारी पहाटे 3 वाजता जोतिबा देवाला अभिषेक करून दवणा अर्पण करण्यात येणार आहे, असे दादा अष्टेकर भक्त मंडळातर्फे कळविण्यात आले
आहे.