प्रतिनिधी/ बेळगाव
जोतिबाच्या नावानं चागभलं च्या गजरात नवरात्रोत्सवात जोतिबा डोंगरावर भक्तांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. मात्र कोरोनाच्या विघ्नात भक्तांचा उत्साह विरुन गेला आहे. बेळगावच्या जोतिबा भक्तांसाठी शिवबसवनगर येथील श्री जालगार मारुती देवालय ट्रस्ट जोतिबा मंदिरात दसरोत्सवानिमित्त रविवारी श्री जोतिबा देवाची पूजा बांधण्यात आली होती. कमळपुष्पातील राजेशाही थाटातील खडी अलंकारी महापूजा करण्यात आली. मनोहरी रुपातील आकर्षक आरास आणि सजावटीमुळे मंदिर परिसर उजळून गेला होता. रविवारी भक्तांनी जोतिबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर कोल्हापूर येथे होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात विविध पूजा बांधण्यात येणार आहेत. या सर्व पूजा श्री पूजक जोतिबा डोंगर, लक्ष्मण प्रभाकर बुबे, महेश बनकर, मयुरेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. भक्तांनी नियमावलीचे पालन करत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.