ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या नंतर आता शिवभोजन थाळी बाबत मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार मिळाला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता देखील पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध असणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी यावेळी नमूद केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी यावेळी केले आहे.