नगराध्यक्ष परब यांची माहिती : पालिकेतील रिक्त पदांचाही प्रस्ताव
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंच पुतळा जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या गेटसमोरील जागेत उभारण्यात येणार आहे. या संबंधी ठराव लवकरच पालिकेच्या सभेत घेतला जाणार आहे. पुतळा उभारणीसाठी खर्चाचा अंदाजित आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिकेत गेली सात-आठ वर्षे विविध खात्यात नऊ रिक्त पदे होती. ही पदे तात्काळ भरावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. गेली अनेक वर्षे ही पदे रिक्तच आहेत. कुणी याकडे लक्ष दिले नव्हते. आपण व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले आहे, असेही परब म्हणाले.
ऐतिहासिक सावंतवाडी शहराला शोभेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना समिती स्थापन करून दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. गत महिन्यात जागा निश्चित करण्याबाबत बैठकीत ठराव एकमताने संमत झाला आहे. यासाठी केशवसुत कट्टा व अन्य दोन जागांची पाहणी करण्यात आली. उद्यानाजवळील मोकळी जागा योग्य आहे. या जागेत पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्यासाठी लागणारा खर्च समितीमार्फत देणगीतून व अन्य माध्यमातून केला जाणार आहे. जवळपास एक कोटी रुपये खर्चाचा हा पुतळा असेल, असेही परब यांनी स्पष्ट केले.
नऊ रिक्तपदांचा प्रस्ताव
पालिकेत गेली 23 वर्षे ज्यांची सत्ता होती, त्या आमदार दीपक केसरकर यांना विविध खात्यातील रिक्तपदे मंजूर करून घेता आली नाही. साधा प्रस्तावही पाठविला नाही. मी पाच महिन्यात या रिक्त पदांबाबत अभ्यास करून नऊ पदे भरण्याबाबत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी चर्चा करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे रिक्तपदांचा घोळ मिटला आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पदे मंजूर करून आणण्यात येतील, असे परब म्हणाले.
दोन हजार वृक्ष लागवड करणार
परब म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात मोती तलाव व कॉटेज रुग्णालय परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला आहे. शहरात विविध प्रजातीची दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, समृद्धी विर्नोडकर, सुरेंद्र बांदेकर, ऍड. परिमल नाईक, राजू बेग, दीपाली सावंत, भारती मोरे, उत्कर्षा सासोलकर,
शिवप्रसाद कुडपकर, सावंत आदी उपस्थित होते.