ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवाजी महाराजांना वंदन केले आहे. मोदींनी शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा फोटो देखील ट्विटवर पोस्ट केला आहे. तसेच शिवाजी महाराज हे महान महानायक आणि भारताचा गौरव असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य पिढय़ानपिढय़ा लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”