संभाजीराजे यांचे प्रतिपादन : राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा
वार्ताहर /किणये
आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. स्वराज्याची संकल्पना आपण पुढे घेऊन जायची आहे. शिवरायांच्या मूर्ती समोर नतमस्तक झाल्यानंतर एक अभिमान वाटतो. स्फूर्ती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करा, धाडस दाखवा, परिश्रम करा, प्रामाणिक राहा आणि महिलांचा सन्मान करा, असे सांगितले आहे. त्यांचे विचार आणि कर्तृत्वामुळे जगण्याला बळ मिळते. केवळ पुस्तक वाचून महाराज समजणार नाहीत, तर शिवरायांचे आचार आणि विचार आत्मसात करा, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राजहंसगडावर केले. राजहंसगडावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने संभाजीराजे बोलत होते.
शिवरायांची भव्य दिव्य मूर्ती
शिवाजी महाराज हे प्रांत आणि देशाच्या पलीकडे आहेत. राजहंसगडावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या भव्य आणि दिव्य मूर्तीमुळे बेळगावची शान नक्कीच वाढेल. बेळगावात आल्यानंतर प्रत्येकाला राजहंसगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन यापुढे घ्यावेच लागेल. इतकी सुंदर शिवरायांची मूर्ती बनविण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी परिश्रम घेतलेले आहेत. त्यांचे कौतुकही संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
भव्य पालखी मिरवणूक
रविवारी प्रारंभी राजहंस गडाच्या पायथ्यावरून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पालखीचे पूजन संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी राजहंस गड परिसर दणाणून गेला होता. पालखी मिरवणूक सुरू असताना महिला पुष्पवृष्टी करीत होत्या. पालखीत अश्वांचा सहभाग होता याचबरोबर काही बालचमुंनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेली होती. महाद्वाराचे पूजन लातूरचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. राजहंस गडावरील पायऱयांवर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले तरुण व तरुणी ढोल ताशांचा गजर करीत होते. हलगी, सनई रणवाद्य सुरू होते. सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर सिद्धेश्वर मूर्तीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजस्तंभाची पूजन व ध्वजारोहण महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मृणाल हेब्बाळकर यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच 50 फूट उंच शिवरायांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होत असल्याने केलेल्या वचनपूर्तीचा हा सोहळा असल्याचे सांगितले.
50 फूट उंच सिंहासनारूढ शिवरायांची मूर्ती
संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते फित कापून शिवरायांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. 50 फूट उंच सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण होत असतानाच सप्तरंगांची उधळण करण्यात आली. हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी राजहंसगडावर शिवप्रेमींची मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार : आमदार धीरज देशमुख
लातूरचे आमदार धीरज देशमुख म्हणाले आपण सारेजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलेलो आहोत. राजहंस गडावरील शिवरायांच्या मूर्तीचा हा लोकार्पण सोहळा गडाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. चांगले काम करणाऱयांना जनता नेहमीच आठवणीत ठेवते, असेही धीरज देशमुख म्हणाले.
शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाऊ : सतेज पाटील
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, आज राजहंसगडावर होत असलेला हा सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा आहे. अत्यंत भव्यदिव्य अशी शिवरायांची मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. राजहंसगडाचा इतिहास उज्ज्वल आहे. मात्र यापुढील इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आजच्या दिवसाचा हा सोहळा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर अंगावर शहारे येतात. शिवरायांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन गेला पाहिजे, असेही सतेज पाटील म्हणाले.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांनी ही शिवरायांची मूर्ती उभारण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. संभाजीराजे यांचा चांदीची तलवार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आमदार सतेज पाटील, धीरज देशमुख यांचाही शाल देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी युवराज कदम यांचे भाषण झाले. या व्यासपीठावर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी यांनी केले.
हे माझं कर्तव्यच…
मला स्वतःला जो मान सन्मान मिळतो, तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे. मी कधी राजकारण करत नाही. मात्र शिवरायांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा असेल तर त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्यच समजतो, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले.