विविध ठिकाणी शिवरायांच्या जयजयकारासह पोवाडय़ांचे सादरीकरण, मेढा येथे सजीव देखावा सादर करून भव्य मिरवणूक
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी विद्यानिकेतन
मराठी विद्यानिकेतन शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यकमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे क्रीडाशिक्षक महेश हगिदळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना महेश हगिदळे यांनी मराठी साम्राज्य व मराठी साम्राज्याची स्थापना करणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला तोड नाही. इतिहासाच्या पानावर त्यांनी आपले नाव कोरले. जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकविणारे राज्य महाराजांनी निर्माण केले. शिवरायांची रणनिती, त्यांची त्यागभावना, गनिमी कावा, राजकारण-समाजकारण यांचा सुरेख मिलाफ स्वराज्यामध्ये घातला. अशा अनेक मुद्यांवर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, गजानन सावंत, सांस्कृतिक विभागप्रमुख बी. एम. पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका श्रुती बेळगावकर यांनी केले.
चन्नम्मा विद्यापीठ मराठी विभाग
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा नेसरकर, डॉ. संजय कांबळे, डॉ. मैजुद्दिन मुतवल्ली उपस्थित होते.
डॉ. विनोद गायकवाड व डॉ. मनीषा नेसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महादेव खोत, संतोष मादकाचे, सतीश जाधव, राणी हिरोजी, पल्लवी कदम, मयुरी मोहिते, नागराज हुरुडे, पद्मजा भांदुर्गे उपस्थित होते. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभा आजरेकर यांनी आभार मानले.
ज्योती सेंट्रल स्कूल
द. म. शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम शाळेच्या शिक्षिका निशा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आला. शिवाजी महाराजांचा जयजयकार करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक जिनेंद्र मुतगी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी शाळेचा विद्यार्थी आदित्य के. याने शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता. मावळय़ांची वेशभूषा परिधान करून पोवाडय़ांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनात असणारा महाराजांबद्दलचा आदर, भक्ती व प्रेम या पोवाडय़ांमधून व्यक्त होत होता. महाराजांचा जयजयकार आणि पोवाडा यामुळे शाळेचा परिसर दणादणून गेला होता. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
वनश्री हायस्कूल, हलगा
खानापूर : द. म. शि. मं. संचालित वनश्री हायस्कूल हलगा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक टी. वाय. भोगण यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छ. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, रणनितीचा व शौर्याचा आढावा घेण्यात आला. यानंतर सर्वांनी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष केला.
कार्यक्रमाला सहशिक्षक एस. एन. पाटील, एम. जे. पाटील, जी. एन. नाकाडी, डी. बी. घोडगिरी, ए. एस. पाटील, डी. एल. बडसकर व इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
शिवगर्जना युवक मंडळ, मेढा
जोयडा : शिवगर्जना युवक मंडळ तिनईमेढा यांच्यावतीने मेढा गावात 391 वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मेढा गावात छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांचा सजीव देखावा सादर करून मिरवणूक काढण्यात आली. विविध गावातील शिवभक्त, नागरिक, महिला वर्ग व बालक आणि युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिवजयजयकार करण्यात आला. यानंतर उपस्थित पाहुणे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)चे जवान अमृत वेंकप्पा देसाई यांच्यावतीने भगवा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
यावेळे अमृत वेंकप्पा देसाई यांचा ग्रामस्थांतर्फे रवळनाथ देवस्थानच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मेढा, आकेती, वरलेवाडी व रंगारुक गावातील नागरिक, महिलावर्ग उपस्थित होता.