ऑनलाईन टीम / सातारा :
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे 5 वाजून 07 मिनिटांनी निधन झाले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर वृद्धापकाळ आणि न्युमोनियामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बाबासाहेबांचे पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जात होते. राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक आणि ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले. तसेच आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र त्यांनी लोकांच्या मनामनात पोहचविले. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते.
19 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या 93 व्या वाढदिवशी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 साली ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासारख्या अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी बाबांना सन्मानित करण्यात आले होते.
सकाळी साडेआठ वाजता त्यांचे पार्थिव पर्वती येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.