प्रतिनिधी / महाबळेश्वर :
संपूर्ण तालुक्यात विस्तारलेल्या घनदाट सदाहरीत जंगलाचे संरक्षण आणि संवर्धनाला प्राधान्य देत वन विभागाच्या वतीने एक शक्तीशाली बोट तापोळा येथील शिवसागर जलाशयात तैनात करण्यात आली आहे. या बोटीचे जलापर्ण वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.
महाबळेश्वर तालुका हा संपूर्ण घनदाट जंगलाने वेढलेला आहे. उपलब्ध वन कर्मचाऱ्यांची संख्या पाहता संपूर्ण जंगलावर लक्ष ठेवणे खुप कठीण होत होते. दूर जंगलात काही अनपेक्षित घटना घडली तर तेथे पोहचण्यासाठी रस्त्याने वाहन घेवुन जावे लागत होते. यामध्ये खुप वेळ जात होता. अनेकवेळा उशिर देखिल होत होता ही उणीव भरून काढण्यासाठी जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी वन विभागातील कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीनुसार वन विभागाने तापोळा येथे एका बोटीची सोय केली होती, परंतु, कोविड काळात ही बोट नादुरूस्त झाली होती. सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी या बोटीची दुरूस्ती करण्याची सुचना महाबळेश्वर वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांना केली. त्यानुसार बोटीची दुरूस्ती करण्यात आली आणि या बोटीवर पूर्वीपेक्षा अधिक शक्तीशाली मोटार बसविण्यात आली. आता या शक्तीशाली बोटीने तापोळा येथुन अवघ्या वीस मिनिटात कोणत्याही ठिकाणी पोहचता येते.