ऑनलाईन टीम / अकोला :
शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया यांच्या बंगल्यावर गुरुवारी तोतया IB अधिकाऱ्याने धाड टाकली. मात्र, बाजोरीया कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे या तोतया अधिकाऱ्याचा भांडाफोड झाला. बाजोरिया यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रतिक संजयकुमार गावंडे (वय 32, राहणार लेडी हार्डिग काँर्टर्स, अकोला) असे या तोतया IB अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर भांदवि कलम 452, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मुर्तिजापूर रस्त्यावरील महाबीज कार्यालयाजवळ आमदार विप्लव बाजोरिया यांचा बंगला आहे. गुरुवारी दि. 31 सकाळी 8 च्या दरम्यान, एमएच 04 एफयू 0919 क्रमांकाची कार त्यांच्या बंगल्यातील पहिल्या महिल्यावर आरोपीने पार्क केली. त्यानंतर आरोपी बंगल्याच्या समोरील बाकावर जाऊन बसला. मी आयबीचा माणूस आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे आणि घराचे कागदपत्र दाखवा, असं म्हणत बाजोरिया यांच्या नातवासोबत त्याने वाद घातला. दमदाटी करून त्यांनी दोन गाडयांची चावी घेतली. त्यानंतर घराचे कागदपत्र मागू लागला. मात्र तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला बंगल्याबाहेर काढून बाजोरिया कुटुंबियांनी खदान पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन गावंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.