प्रतिनिधी / कवठेमहांकाळ
वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याच्या रागातून मनोहर पाटील यांचा युवराज पाटील यांच्या मुलासह सहाजणांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मनोहर पाटील यांच्या खूनप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिनकर पाटील, अभिजित युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक केली आहे. तर नामदेव संभाजी सावंत आणि दोन अनोळखी आरोपी पसार आहेत.
मे 2017 सरपंच युवराज पाटील हरोली येथे खून झाला होता. हा खून मनोहर पाटील यांनी सुपारी देऊन केला असल्याचा संशय युवराजचा मुलगा अभिजित व भाऊ दिनकर पाटील यांना आला होता. त्यातून गेली दोन वर्षे हे प्रकरण धुमसत होते. तर युवराज पाटील यांच्या खुनाच्या अगोदर पंचायत समितीच्या निवडणूक निकालादिवशीच माजी सरपंच सूर्यकांत पाटील यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. त्यात ते मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून खुनाची मालिका सुरू झाली होती.
मयत मनोहर पाटील यांचे बंधू संजय बाळासाहेब पाटील यांनी दिनकर पाटील, अभिजित पाटील, विनोद पाटील, नामदेव सावंत आणि दोन अनोळखी इसमांनी पूर्ववैमनस्यातून खून केला आहे, अशी फिर्याद पोलिसांत दिली आहे.
गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास मनोहर पाटील यांचा बोरगाव-देशिंग रोडवर देशिंग हद्दीत ओढय़ाजवळ सहाजणांनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, पोटावर, हातावर वार करून खून केला होता. या खुनाने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली होती.
मनोहर पाटील यांच्या खुनाची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे कवठेमहांकाळकडे धाव घेतली. आणि पाटील यांच्या खुनातील आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांना दिल्या.
गुरूवारी रात्री पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील यांच्या घरी गेले तेथून दिनकर पाटील व विनोद पाटील यांना ताब्यात घेतले. तिसरा आरोपी अभिजित पाटील याला कवठेमहांकाळच्या ग्रामीण रूग्णालयानजीक ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी त्यांना अटक केली.
मनोहर पाटील यांच्यावर कोयता व सुऱयाने नऊ वार केल्याचे कोळी यांनी सांगितले. तसेच पाटील यांच्या खूनप्रकरणात वापरलेली चारचाकी व दुचाकी गाडी जप्त केली आहे. सहाजणांवर दहशत माजविणे, जमाव जमविणे, कट रचणे, खून करणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पसार तीन आरोपींना अटक करण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना केले आहे, असेही कोळी यांनी सांगितले. दरम्यान, मनोहर पाटील यांच्या शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.