प्रतिनिधी/ गुहागर
पोलिसांनी बुधवारी टाकलेल्या छाप्यात गुहागर शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष (बाबू)सावंत याच्या जामसूद येथील घरामध्ये अवैध दारूचा साठा आढळून आला आहे. पोलिसांना सावंत अवैधरित्या दारूविक्री करताना आढळल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.
गुहागर तालुक्यातील जामसूद येथे एका घरातून गोवा बनावटीची दारू विकली जात असल्याची कुणकूण गुहागर पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जामसूदमध्ये तपासणी गेली असता चक्क शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संतोष (बाबू) सावंत याच्या घरातूनच दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर, राजू कांबळे, आनंद पवार, सचिन पाटील, मयेकर आदी पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारी दीड वाजता जामसूद येथे टाकलेल्या छाप्यात घरामध्ये विक्रीस ठेवलेला देशी-विदेशी बनावटीचा दारू साठा आढळून आला. सुमारे 5490 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे . याप्रकरणी सावंत याच्यावर महाराष्ट्र पोलीस प्रदूषण कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कादवडकर करत आहेत.