प्रतिनिधी / बेळगाव
कन्नड, मराठी फलकांवर काळे फासण्याच्या प्रकारांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी पुन्हा एकदा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. शिवाय ते शिवसेना कार्यालयाकडे जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस बंदोबस्तामुळे वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केवळ जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करून चन्नम्मा चौकात आंदोलन छेडले.
आंदोलन छेडून वेदिकेचे कार्यकर्ते शिवसेना कार्यालयाकडे जाणार, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर रामलिंगखिंड गल्लीकडे जाणाऱया रस्त्यावर बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, त्यांनी शिवसेना कार्यालयाकडे फिरकण्याचे धाडस केले नाही. मागील आठवडय़ात वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून गोंधळ माजविला होता. त्यानंतर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा गुरुवारी वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिवसेना कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे वेदिकेचे कार्यकर्ते चन्नम्मा चौकात आंदोलन करून माघारी परतले.