प्रतिनिधी / सांगली
शिवसेना कार्यालय, गणेश मार्केट सांगली येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सांगलीतील ज्येष्ठ समाजसेवक सतीश भाऊ साखळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी शहा व प्रियंका साळी यांनीही प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी चर्चा करताना सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण भारतात शिक्षणाचा प्रसार केला. महिलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन केले. मात्र शिक्षणाच्या बाबतीत सांगली-मिरज शहर खूप महत्त्वाचे असताना, अशा मोठ्या शहरांमध्ये एखादे कृषी विद्यापीठ, वैद्यकीय विद्यापीठ, क्रीडा विद्यापीठ, इत्यादी सारखे विद्यापीठ सांगलीत असावे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र असणे गरजेचे आहे अशी मागणी जनतेची असल्याने याकडे केंद्र सरकारने राज्य सरकारने व स्थानिक मंत्राने लक्ष घालून येथे विद्यापीठ उभा करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी साखळकर म्हणाले, येथून पुढच्या काळात सांगलीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे सांगली व मिरज शहर हे खूप मोठे आहेत. पण त्या तुलनेत खूप मोठ्या सुविधांपासून वंचित आहे, हे कार्यकर्त्यांनी व शासनाने लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, जयश्री कोळी, बाहुबली ट्रान्सपोर्टचे मालक महेश पाटील, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.