प्रतिनिधी / सांगली
जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी आलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना पोलीस अधिकाऱयांनी सभागृहात जाताना रोखल्याचा प्रकार शनिवारी सांगलीत घडला. यावेळी खा. माने आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकाराने खासदारांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. अचानक घडलेल्या प्रकाराने खासदारांचे कार्यकर्ते संतप्त झाले. पोलिसांकडून खासदारांना अशाप्रकारे वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल अशीही चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू होती.
जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी दुपारी सभेसाठी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खा. संजयकाका पाटील यांच्यासह खासदार, आमदार, नियोजन समितीचे सदस्यांना निमंत्रित केले होते. या बैठकीसाठी हातकणंगले मतदार संघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने सभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहासमोर आले असता सभागृहाच्या प्रवेशद्वारावर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस फौजफाटय़ासह तैनात होते. यावेळी खासदार माने सभागृहात जाताना पोलीस निरीक्षक तनपुरे यांनी त्यांना सभागृहात जाता येणार नाही, म्हणून थांबविले.
खासदार माने यांनी त्यांची ओळख करून दिली, मात्र त्यानंतर प्रशासनाकडून आदेश दिल्याचे सांगताच खासदार माने संतापले. त्यांनी तुम्ही लोकप्रतिनिधींचा अपमान कसा काय? करू शकता. रस्त्यात अशाप्रकारे लोकप्रतिनिधीना अडविणे बरोबर नाही, म्हणून त्यांनी आक्रमकपणे पोलीस अधिकारी आणि प्रशासनाविरोध आक्रमक भूमिका घेऊन अधिकाऱयांना झापले.
लोकप्रतिनिधीनाही अडवून आपण काय सिद्ध करू पाहत आहात, असा जाब देखील यावेळी खा. माने यांनी विचारला. आजचा कार्यक्रम सात वाजता खासदारांनी पोलीस अधिकाऱयांचा विचारल्याने तिथे उपस्थित असलेले लोक जमले. त्यानंतर पोलीस निरीक्षक तनपुरे म्हणाले, मी बाजूला जात आहे. तुम्ही सभागृहात जावे, अशी विनंती खासदार माने यांना केली. त्यानंतर खासदार सभागृहात गेले. खासदार आणि पोलीस अधिकारी यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक झाली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.