मुंबई/प्रतिनिधी
दादरमधील शिवसेना भवनासमोरील भाजपच्या आंदोलनानंतर भाजप-शिवसेनेत सुरू झालेला वाद शमत असतानाच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. आमदार लाड यांनी ‘आम्ही माहीममध्ये आलो तर त्यांना वाटते की आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो की काय, पण वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते. आत त्यांच्या या विधानाला उत्तर देताना आमदार राजन साळवी यांनी शिवसेना भवन फोडणं देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही, असं म्हणत सेनाभवन फोडणाऱ्यांचं थोबाड फोडू असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने संतापलेले शिवसेना आमदार राजन साळवी यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. शिवसेना तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी लाड यांना सुनावलं आहे.