सावंतवाडी पालिका सभा : सदस्य एकमेकांच्या अंगावर गेले धावून : ठराव वाचनावरून वाद
मुख्याधिकाऱयांना द्यायची होती ठरावावर माहिती मात्र, पुढच्या ठरावाचे केले वाचन
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक बैठकीत विरोधी शिवसेना आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे काही मिनिटे सभागृहात गोंधळ उडाला. या प्रकाराबद्दल नगराध्यक्ष संजू परब यांनी नाराजी व्यक्त करत हे वागणे संस्कृतीला धरून नाही. पुन्हा असा प्रकार घडल्यास सत्ताधारी-विरोधक असा भेदभाव न ठेवता सभागृहाबाहेर काढले जाईल, असा इशारा देताच नगरसेवक शांत झाले.
सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नऊ नंबरच्या ठरावाचे वाचन भाजपच्या उत्कर्षा सासोलकर यांनी केले. त्यानंतर लागलीच ठराव मंजूर असे भाजपच्या सदस्यांनी म्हणत पुढील ठराव वाचन करा, असे सूचित करताच दहा नंबरचा ठराव वाचनाला आला. तेव्हा मुख्याधिकारी जावडेकर यांनी आपल्याला नऊ नंबरच्या ठरावाबाबत माहिती द्यायची आहे, असे सांगितले. मात्र, तोपर्यंत अकरा नंबरच्या ठरावाचे वाचन पूर्ण झाले होते.
ठराव पुन्हा वाचण्याची मागणी
शिवसेनेचे सुरेंद्र बांदेकर आणि भारती मोरे यांनी नऊ नंबरचा ठराव पुन्हा वाचन होऊन चर्चा करावी, अशी मगणी केली. त्यावर भाजपचे नासीर शेख, सुधीर आडिवरेकर यांनी हा ठराव पुन्हा चर्चेला नको. सभागृहाच्या शास्त्रानुसार एकदा ठराव वाचला की पुन्हा मागील ठरावाचे वाचन होत नाही, असे सांगितले. त्यावर शिवसेनेचे सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दीपाली सावंत, बाबू कुडतरकर, माधुरी वाडकर यांनी खुर्चीवरून उठून पुन्हा ठराव वाचा, अशी मागणी ज्केली. त्यावर भाजपचे नासीर शेख, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक हेदेखील खुर्चीवर उठून जोरजोरात आरडाओरड करू लागले. शिवसेनेचे बाबू कुडतरकर यांनी सत्ताधारी नगरसेवकांचे वागणे योग्य नाही. नगराध्यक्षांनाच जुमानत नाहीत, असे म्हणताच भाजपचे सदस्य संतापले. दोन्ही पक्षाचे सदस्य एकमेकांच्या अंगावरून धावून गेले. हा ड्रामा तब्बल 15 मिनिटे सुरू होता. अखेर नगराध्यक्षांनी शांत राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सदस्य शांत झाले.
शेवटची घटना, नगराध्यक्षांकडून तंबी
परब यांनी शहर बदनाम होईल, संस्कृतीला बाधा येईल, असे वागू नका. माझ्या कारकीर्दीतील हा प्रकार शेवटचा. मी यापुढे कुणाचीही गय करणार नाही. सभागृहाबाहेर काढेन, असे सूचित केले. मुख्याधिकारी जावडेकर ठरावाबाबत माहिती देत होते. मग असा गदारोळ करणे निंदनीय आहे. असा प्रकार पुन्हा घडता नये, अशी ताकीद दिली.
वाहतुकीबाबत 20 फेब्रुवारीला बैठक
शिवसेनेचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी शहरात वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले. त्यावर नगराध्यक्ष परब यांनी वाहतूक नियोजनाबाबत 20 फेब्रुवारीला बैठक घेऊन नियोजन करू, असे स्पष्ट केले. भाजपचे आनंद नेवगी यांनी वाहतूक प्रश्न मांडला.
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आणि शिवसेनेच्या भारती मोरे, माधुरी वाडकर, दीपाली सावंत यांनी मंगळवारचा आठवडा बाजार मोती तलावाकाठी भरतो ते चांगले आहे. पण वाहतूक नियोजन हवे. बाजार खरेदी करताना महिलांना त्रास होतो. अपघाताची शक्यता आहे. स्ट्रीटलाईटच्या धोका निर्माण होत आहे, याकडे लक्ष वेधले. त्यावर परब यांनी आठवडा बाजारादिवशी एसटी व अवजड वाहनांना बंदी करण्यात येईल. एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. ‘तरुण भारत’ने याबाबत आवाज उठविला होता.