प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेचे दहा ते बारा उमेदवार विजयी होतील असे आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत हि संख्या वाढण्याची शक्यता आहे, याचा अंदाज आल्याने शिवसेनेचा आवाज दाबण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून सुरु असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला. तसेच महापालिकेतील सत्तेचा दुरउपयोग करत काँग्रेस नेत्यांनी अधिकाऱयांना हाताशी धरत प्रारुप मतदार यादीत जाणीवपुर्वक बदल केले आहेत. त्यामुळे महापालिकेने यादीमधील त्रुटी दूरुस्त कराव्यात अन्यथा महापालिकेला घेरावा घालून कामकाज बंद पाडण्याचा इशारा इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
इंगवले म्हणाले, फिरंगाई प्रभागातील यादीत सुमारे 1 हजार मतदारांचा घोळ करण्यात आला आहे. प्रभागातील मूळ रहिवासी असलेली 600 ते 1000 नावे इतर प्रभागांच्या यादीत टाकली आहेत. तर ज्यांचा प्रभागाशी काहीही संबंध नाही अशी मिराबाग, दुधाळी, निगडे वसाहत, दांडगाईवाडी, संभाजीनगर, रंकाळा, आयटीआय, म्हाडा कॉलनी, शाहू कॉलनी, बळवंत नगर, वेताळ तालीम, खंडोबा तालीम, मरगाई गल्ली, हराळे गल्ली, वाशी नाका येथील सुमारे 1 हजार नावे फिरंगाई प्रभागात समाविष्ट केली आहेत.
एखाद्या प्रभागातील मतदार यादीत 50 ते 100 नावांचा घोळ होणे समजू शकतो. मात्र 1 हजारा नावांची आदला बदली होणार असेल तर हि बाब शंकास्पद असून गंभीर आहे. त्यामुळे या फेरफारीमागे कोण आहे हे समोर येणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने कोणच्या सांगण्यावरुन हा भोंगळ कारभार केला असेल तर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करण्याची मागणीही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करणार असल्याचे इंगवले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला राजू घोरपडे, उदय मोरे, तात्या साळोखे, सुकुमार लाड, जीवन घोरपडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फिरंगाईसह अनेक प्रभागात घोळ
शहरातील फिरंगाई प्रभागासह अनेक प्रभागातील मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. अनेक इच्छूक उमेदवारांची हक्काची मते इतर प्रभागांच्या यादीत टाकली आहेत. त्यामुळे आघाडीवर असूनही मतदार यादीतील बदलांमुळे अनेक इच्छूकांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. तरी मतदार यादीबाबत तक्रारी असल्यास नागरिक, इच्छुक यांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधवा असे आवाहनही इंगवले यांनी केले.
त्रुटी दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन
प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीत प्रचंड घोळ आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार करायचा कि नावे शोधत बसायची असा प्रश्न आहे. प्रशासनाने यादीतील त्रुटी तत्काळ दुरुस्त कराव्यात, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरप्रमुख इंगवले यांनी दिला आहे.