प्रतिनिधी / कोल्हापूर, कागल
बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदीके संघटनेने लावलेल्या लाल-पिवळा ध्वज काढण्यासाठी सोमवारी बेळगावमध्ये काढण्यात येणाऱया मोर्चात सहभागी होण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने हदनाळ गावात गनिमीकाव्याने भगवा झेंडा फडविला. जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कागलमधून बेळगाव पोलिसांना गुंगारा देत गनिमीकाव्याने हदनाळमध्ये प्रवेश केला. तेथे जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्रच्या घोषणा देत बेळगावबंदीची आदेशाची होळी करत शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदीकेच्या कृत्याचा निषेध केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावमध्ये सोमवारी कन्नड रक्षक वेदीकेने लावलेला ध्वज काढण्यासाठी सरदार हायस्कूलच्या मैदानावरून मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चा राज्यातील शिवसैनिकांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकही सहभागी होणार होते. पण बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना बेळगाव जिल्हा बंदीची नोटिस पाठविली होती. त्यामुळे शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कोगनोळी नाक्यावर शिवसैनिकांना रोखले
शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, कागलचे पोलीस निरीक्षक नाळे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त कागल चेक परिसरात तैनात करण्यात आला होता. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बेळगावला मोर्चाला जाण्यासाठी विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कागलमधून कर्नाटक हद्दीत कोगनोळीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथे दूधगंगा नदीपूल पार करून शिवसैनिक कोगनोळी टोल नाक्याकडे जात असताना कागल पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांनी रोखल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी घोषणा सुरू केल्या. बेळगाव जिल्हाबंदीची नोटीस जाळून शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा, मराठी भाषिकावर सुरू असलेल्या अन्यायाचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांना धुमश्चक्री झाली. पोलिसांनी देवणे, पवार यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सूचना देऊन सोडून दिले.
हदनाळमध्ये फडकविला भगवा ध्वज!
कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक पोलिसांना कोणताही सुगावा लागणार नाही याची दक्षता घेत गनिमीकाव्याने मोटारसायकलवरून थेट हदनाळ गावात प्रवेश केला. तेथे पोहचताच शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी भाषकांवर अन्याय करणाऱया, दडपशाही करणाऱया कर्नाटक सरकारचा निषेध असो, कन्नड रक्षक वेदिकेचा निषेध असो, अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. या घोषणबाजीतच शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडविला. त्यानंतर शिवसैनिक कोल्हापूरला परतले. या आंदोलनात कागल तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, युव सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील-भुदरगड, राधानगरी तालुका प्रमुख भिकाजी हळदकर, करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, उपजिल्हा महिला संघटक, सौ. विद्या गिरी, तालुका महिला संघटक सौ. कांचन माने, कागल शहर महिला संघटक, दीपाली घोरपडे, विकास उरवसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदीके संघटनेने लाल-पिवळा ध्वज लावून सिमाबांधवांसह महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या स्वाभिमानाला आव्हान दिले. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर निर्बंध घालत कन्नड रक्षक वेदीकेच्या कृत्याला साथ देत आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी हदनाळमध्ये भगवा फडकवित सिमाबांधवांच्या लढÎाला साथ दिली तर कर्नाटक सरकारचा निषेध केला.
-विजय देवणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना, कोल्हापूर