प्रतिनिधी / कोल्हापूर
बंगळुर येथील सदाशिवनगरमध्ये घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरात महामार्ग रोखून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच कर्नाटक वाहनांच्या नंबर प्लेटवर काळे फासले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱया कानड्यांचा धिक्कार नोंदवत, हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अन्यथा बंगळुरमध्ये घुसून कोल्हापूरी हिसका दाखवू असा सज्जड इशारा यावेळी शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कर्नाटक येथे भाजप सरकार आहे. केंद्रातही भाजप सरकार आहे. भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करावे अन्यथा आम्ही तेथे घूसुन त्या देशद्रोह्यांचा बंदोबस्त करुन असा इशारा दिला. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना तत्काळ अटक करा अन्यथा कोल्हापूरातील कन्नड व्यावसायीकांचे व्यवसाय बंद करु, तसेच कर्नाटकातून येणारी वाहतूकही रोखून धरली जाईल असा इशारा देण्यात आला.
कर्नाटक वाहनांना फासले काळे
पुणे – बेंगलुर महामार्गावरुन कर्नाटककडे जाणाऱया वाहनांना तावडे हॉटेल नजीक अडविण्यात आले. वाहनांच्या नंबरप्लेटला काळे फासण्यात आले. तसेच वाहनांच्या काचांवर जय महाराष्ट्र लिहण्यात आले. यानंतरच या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले.
अन्यथा कोल्हापूरी हिसका
केंद्रात व कर्नाटकात भाजप सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळत्याची विटंबना करणाऱया भ्याड कन्नडीगांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई करण्यात कोणतीही दिरंगाई अथवा पक्षपतीपणा झाल्यास कर्नाटक सरकारला कोल्हापूरी हिसका दाखवण्यात येईल. बेंगळुरमध्ये घूसुन त्यांना कोल्हापूरी प्रसाद देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कानड्यांचा धिक्कार अन् घोषणाबाजी
महामार्गावर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी जोरदार घोषणाजी केली. घोषणाबाजी करताना कन्नडांचा निषेध नोंदविण्यात आला