प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्यावतीने सीमाभागाकरिता जिल्हा शिवसेनेला हायटेक रुग्णवाहिका देण्यात आली होती. ती आता सेवेत दाखल होत आहे.
यापूर्वीच या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र आरटीओ नोंदणी व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते. याचबरोबर रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय उपकरण साहित्य बसविणे गरजेचे होते. ते सर्व काम पूर्ण झाले असून येत्या आठवडय़ाभरात रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती सीमाभाग सहप्रमुख अरविंद नागनूर यांनी दिली आहे.
सर्वांनाच ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी
जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठाही करावा, अशी मागणीही शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे. काही स्वयंसेवी संस्थाही कोविड सेंटर सुरू केले होते. तसेच घरोघरी जाऊन ऑक्सिजन सिलिंडर पुरविले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे चुकीचे आहे. तरी सर्वांनाच ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, रविंद्र जाधव, दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, आदी मान्यवर उपस्थित होते.