प्रतिनिधी/ सातारा
अभिनेत्री कंगणा रानावत हिने एका वाहिनीला दिलेल्या प्रखट मुलाखतीमधील संदर्भाच्या निषेधार्थ साताऱयात शिवसेनेच्यावतीने शनिवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रमुख यशवंतराव घाडगे यांचा आदेश मिळताच शिवसैनिक कामाला लागले. नाक्यावर अभिनेत्री कंगणा रानावत हिचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन जिल्हा प्रमुखांची प्रतिक्षा करत थांबले होते. आंदोलनास सुरुवात होताच पुतळा आंदोलनस्थळी आणतानाच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांचा हिरमोड झाला. पोलिसांजवळ शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंतराव घाडगे यांनी अचानकपणे अभिनेत्री कंगणा रानावत हिच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे आदेश सातारा शहरातील शिवसैनिकांना फोनवरुन देताच सातारचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख आतिश ननावरे, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह शिवसैनिक हे गळय़ांत शिवसैनेचे गमजे अडकवून तयार होते. कंगणा रानावत हिचा प्रतिकात्मक पुतळाही तयार करुन ठेवला होता. जिल्हा प्रुमख यशवंतराव घाडगे हे येताच कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी देशद्रोही कंगणा रानावत हिचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. सचिन मोहिते यांनी रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यास प्रतिकात्मक पुतळा घेवून येण्यास सांगितले. तो पुतळा घेवून आंदोलनाच्या ठिकाणी येताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेताच शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला पुतळा तरी जाळू द्यायचा ना. इतर ठिकाणी जाळु देता, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडे शिंदे यांनी व्यक्त केली.