तरुण भारत ऑनलाइन टीम
जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत होत्या. सुदैवाने या हल्ल्यात कसलीही दुखापत झालेली नाही. पण हा हल्ला शिवसेनेतील लोकांनी केला आहे असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
रोहिणी खडसे यांनी स्वत: याबाबत आज प्रतिक्रिया दिली. ‘तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकानं माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, आणि ते फरार झाले . ‘मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.