वरिष्ठ पदाधिकारी नियुक्तीवरून पक्षाच्या गुप्त बैठकीत पडसाद
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा शिवसेनेत अंतर्गत सुरू असलेल्या ‘गृहकलहा’ने सेनेची वैभवशाली परंपरा खिंडीत सापडली आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नुकत्याच झालेल्या तालुका पातळीवरील प्रमुख व इतर पदाधिकाऱयांच्या गुप्त बैठकीत या सुप्त कलहाला वाचा फुटली. जिल्हय़ाशी संपर्क ठेवणाऱया नेत्याच्या बदलाबाबतच्या ‘फिल्डिंग’मुळे ही मंडळी संतप्त असल्याचे समजते. दरम्यान, या वादाचे पडसाद थेट ‘मातोश्री’पर्यंत पोहोचले असून दोन लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने संपर्काबाबतची स्थिती जैसे थे ठेवत पर्यायी नावालाही नव्या पर्यायाने संतुष्ट करण्याबाबतची आखणी पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत सुरू असलेला कलह गेले काही महिने चर्चेत आहे. यापूर्वीही या कलहाच्या अनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या. मात्र, नुकतीच जिल्हय़ाच्या मुख्यालयात झालेली बैठक वादळी झाल्याचे समजते. जिल्हय़ाशी संपर्क असलेल्या पदाला इच्छुक असलेल्या नेत्याने प्रसंगी सोडचिठ्ठी देण्याची भूमिका खासगीत व्यक्त केल्यानंतर अंतर्गत घडामोंडीना वेग आला. याबाबतची माहिती जिल्हय़ातील तालुक्यांशी संबंधित प्रमुख व इतर पदाधिकाऱयांना मिळताच त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित नेत्याला पद देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, जिल्हय़ाशी संपर्क साधायचे असलेले ‘तेच’ पद कशासाठी? त्यांच्यासाठी इतर पर्याय अथवा नवीन पर्याय शोधा. मात्र, तसे न करता, ‘त्याच’ पदाबाबत निर्णय होत असेल, तर प्रसंगी पदांचे राजीनामे देण्यापर्यंत विषय वाढला. यावेळी अनेकांनी आपल्या मनातील खदखद संतप्तपणे व्यक्त केल्याचे समजते. तसेच इच्छुक नेत्याच्या पाठिशी राहण्याच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या बैठकीनंतर काही वरिष्ठ लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांमार्फत हा विषय ‘मातोश्री’पर्यंत पोहोचविण्यात आला असल्याचे समाजते. तसेच दोन जिल्हय़ांशी संबंधित असलेले सचिवस्तरीय नेते व व जिल्हय़ाचे पालकनेते यांच्या माध्यमातून याविषयी काही प्रमुख मंडळींसमवेत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याबाबतचा पर्याय पुढे आला असल्याचे समजते. तरीही जिल्हय़ाच्या संपर्काबाबतीतील त्या पदाशी संबंधित कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्य नेत्याला दुसरे कोणतेही पद द्या. मात्र, ज्यांनी वर्षानुवर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांच्याबाबत असा निर्णय घेण्यास कुणी भाग पाडत असेल, तर गप्प बसणार नाही, अशी भूमिका पुढे आली असल्याचे समजते.