नाशिकच्या शिवसैनिकांचा पुढाकार : लक्ष्मी मंदिरात केली विधीवत पूजा
प्रतिनिधी/ संकेश्वर
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांची 4 फुटी मूर्ती नाशिकच्या शिवसैनिकांनी सोमवारी मणगुत्ती (ता. हुक्केरी) गावास भेटीदाखल दिली. मूर्तीचे आगमन गावातून ग्रामदैवत श्री लक्ष्मी मंदिराच्या आवारात झाले. यावेळी गावकऱयांच्या उपस्थितीत मंदिरात मूर्तीची विधीवत पूजा करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा-अर्चा मंदिरात व्हावी. तसेच शिवरायांचा आदर्श नव्या पिढीला घेता यावा, असा हेतू सदर शिवसैनिकांचा होता. मात्र मंदिरात मूर्तीचे व्यवस्थापन होणार नाही असे गृहीत धरुन गावातील एका महिलेने पुढाकार घेत शिवराय आमचे दैवत असून मी माझ्या घरीच पूजा करण्यासह मूर्तीचे व्यवस्थापन करते, अशी हमी देत शिवमूर्ती ताब्यात घेतली व मूर्तीची पूजा करत आपल्या घरीच प्रतिष्ठापना केली.
शिवराय आपले आराध्यदैवत
शिवरायांनी अखंड हिंदुस्थानचे रक्षण केले. शिवरायांची कामगिरी आजही अंगावर शहारे आणणारी आहे. शत्रुशी झुंज देण्याबरोबरच उत्तम प्रशासन, सामाजिक, धार्मिक बांधिलकी व दूरदृष्टीकोन लक्षात ठेवून त्या दृष्टीने नियोजन करण्याची त्यांची हातोटी आजतागायत कोणत्याही राजाला जमली नाही. मणगुत्ती गावास शिवमूर्ती भेट देण्यासाठी नाशिकहून शिवसैनिक पोहोचले. पण यावेळी गावकऱयातील निरुत्साहीपणा आम्हाला कांहीसा खटकल्याची नाराजी नाशिकचे नगरसेवक गोरख खर्जुळ यांनी व्यक्त केली. भावी पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली तरच अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळणार आहे. अन्यथा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी योगेश खर्जुळ, अशोक सांगले, बाळू वाचवरे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.