आंतरराज्य सीमेवर हजारो शिवसैनिकांचा रॅलीत सहभाग : टोलनाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप
वार्ताहर / कोगनोळी
बेळगाव महापालिकेनजीक लाल-पिवळा झेंडा लावल्याने 8 मार्च रोजी मराठी भाषिकांच्यावतीने मोर्चाचे नियोजन केले होते. या मोर्चाला कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी येथील महामार्गावर कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांचा सोमवारी सकाळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा शिवसेना मंडळ कर्नाटक सीमेवर मोटारसायकल रॅलीने येताच त्यांना बेळगावकडे जाण्यापासून पोलिसांनी सीमेवरच रोखले. कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांना बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीचा आदेश काढला होता. या आदेशाची प्रत कर्नाटक पोलिसांनी त्यांना सादर करताच त्यांनी त्या प्रतीची होळी केली आणि आपण बेळगावात जाण्यास ठाम आहोत, असे सांगितले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेना शिष्टमंडळाला ताब्यात घेतले.
यावेळी कर्नाटक पोलिसांतर्फे मंडल पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी. एस. तळवार, साहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी, पी. एम. घस्ती, अमर चंदनशिवे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, एपीआय दीपक वाकचौरे, सुशांत चव्हाण, निखिल खर्चे, पीएसआय प्रितमकुमार पुजारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
या मोर्चामध्ये सुजित चव्हाण, प्रकाश पाटील, वैभव आडके, अशोक पाटील, मंजित माने, शिवगोंडा पाटील, विद्या गिरी, दिपाली घोरपडे, कांचन माने आदांसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.