पेट्रोलपंप चालकाने अतिक्रमण केल्याने कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले असून, बाजारपेठेसह उपनगरांत सेटबॅक न सोडताच इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील पेट्रोलपंप चालकाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्यावतीने करण्यात आली.
सेटबॅक सोडून इमारत बांधण्याची अट महापालिकेकडून घातली जाते. पण बांधकाम परवानगी न घेताच इमारती बांधण्यात येत आहेत. इमारत बांधकाम परवानगी घेऊन सेटबॅक न सोडताच बांधकाम करण्यात येत आहेत. शहर आणि उपनगरांत अनधिकृत बांधकामांचे पेव वाढले आहे. विशेषतः रामलिंगखिंड गल्ली परिसरात सेटबॅक न सोडताच इमारतींचे बांधकाम सुरू आहे. काही इमारतधारकांनी चक्क गटारीवर बांधकाम केले आहे. प्रमुख रस्त्यांवरही अनधिकृत बांधकामे केली जात आहेत.
शिवाजीनगर पेट्रोलपंपजवळ 120 फूट रस्त्यावर बांधकाम करण्यात आल्याने ते हटविण्याची मागणी करण्यात आली होती. पण सदर जागा मालकीची असल्याचे सांगून अनधिकृत बांधकाम हटविण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मंगळवारी सदर अतिक्रमण महापालिकेच्यावतीने हटविण्यात आले. हा रस्ता मोकळा करण्यात आला. अशाप्रकारे असंख्य ठिकाणी अनधिकृत बांधकामे असून त्याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.