प्रतिनिधी/ कराड
सुमधुर बासरी, पियानोचा नाजूक सूर, बुलबुलची लय आणि या वाद्यांना माऊथ ऑर्गन व तबल्याची सुंदर साथ अशा स्वरसुमनांचा सुरेख संगम नागरिकांना अनुभवता आला. येथील शिवाजी सोसायटीमधील छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये ही संगीताची मैफल भरवण्यात आली होती. या मैफलीने नागरिक मंत्रमुग्ध झाले होते.
शिवाजी सोसायटीकडून छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. दर रविवारी सायंकाळी गीतसंध्या आयोजित केली जाते. यामध्ये सोसायटीमधील इच्छुक नागरिक गीत सादर करतात. दोन तास रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या महिन्यात पाचवा रविवार असल्याने गाणी म्हणण्याऐवजी वाद्यसंगीत मैफल भरवण्यात आली होती. यावेळी ‘मोगरा फुलला’, ‘मितवा’, ‘सपनोंकी राणी’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ अशी विविध गीते, भक्तीगीते वाद्यांवर वाजवण्यात आली.
ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, नगरसेविका प्रियांका यादव, पी. एल. कुलकर्णी, सुधीर शिराळकर, अशोकराव शिंदे, डॉ. देवदत्त देशपांडे, सुभाष शहा, संभाजीराव मोहिते, बाळ देवधर, ए. आर. पवार, राजू शहा, जयराम सचदेव, अमीन बागवान, दत्ता पाटील, जालिंदर काशिद, रमेश पवार तसेच नागरिकांची उपस्थिती होती.