म्हैसाळ/प्रतिनिधी
म्हैसाळ येथील शिवाजी नगर प्रभागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र केवळ शोरूम झाले असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उपचार केला जात नसून एखाद्या ठराविक दिवशीच ते उघडले जाते. अन्यथा इतर दिवशी ते बंदच असते. त्यामुळे या परिसरातील लोकांना हे उपकेंद्र केवळ शो साठी उभारले आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. म्हैसाळ गावचा वाढता विस्तार पाहता व वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्येच्या गरजेनुसार या ठिकाणी शिवाजीनगर प्रभागात नवीन उपकेंद्र उभारण्यात आले आहे. सुरुवातीला काही दिवस याठिकाणी आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून उपचार करीत होते. मात्र अलिकडे या उपकेंद्रात कर्मचारी येत नसल्याने दे सदैव बंदच असते. त्यामुळे येथील रुग्णांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, महिन्यातून एखाद्या शिबिरावेळीच हे उपकेंद्र उघडले जाते. अन्यथा एरवी हे उपकेंद्र बंदच असते. अलिकडे या उपकेंद्राची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या केलेल्या आहेत. अत्यंत आकर्षक असा शोरूम टाईप दवाखाना उभारण्यात आला आहे. मात्र उपकेंद्र कायमस्वरूपी सुरू नसल्याने औषधोपचार केले जात नाही. त्यामुळे हे उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाल्याची चर्चा ग्रामस्थ मधून व्यक्त होत आहे.
नियमितपणे उपकेंद्र सुरू केल्यास या भागातील शिवाजी नगर, अंबिका नगर, गणेश कॉलनी या विस्तारित भागातील रुग्णांची चांगली सोय होणार आहे . बहुतांश सगळे उपचार म्हैसाळ येथील मुख्य आरोग्य केंद्रात केले जातात. त्यामुळे या भागातील रूग्णांना पायपीट करत याठिकाणी नाईलाजास्तव जावे लागते. हे उपकेंद्र सुसज्ज असून ही याचा उपयोग का केला जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे हे उपकेंद्र काय शोरूम म्हणून उभारले आहे का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.