जि. प. विशेष सर्वसाधारण सभा : जागेचा अहवाल आल्यानंतर पुढील सभेत मंजुरी देण्याचा निर्णय
प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांना कारवाईची नोटीस परसबाग कुक्कुटपालन योजनेला मंजुरी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या जागेतील जिल्हा परिषदेची इमारत निर्लेखित करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याच्या विषयावरून जि. प. च्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कणकवली सभापती, नगराध्यक्ष यांना सोबत घेऊन बांधकाम विभागाने जागेची पाहणी करावी व त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केल्यावर पुढील सभेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जि. प. ची विशेष सर्वसाधारण सभा जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास समिती सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, गटनेते रणजित देसाई, नागेंद्र परब, संतोष साटविलकर, अंकुश जाधव, प्रीतेश राऊळ, डॉ. अनिशा दळवी, अमरसेन सावंत, प्रदीप नारकर, स्वरुपा विखाळे, अन्य बहुसंख्य सदस्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली शहरामध्ये असलेल्या दोन गुंठे जागेतील इमारतीसह 23 गुंठे जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने 99 वर्षांच्या लीजवर जिल्हा परिषदेला दिली होती. या जागेतील इमारतीला 60 वर्षे होऊन गेल्याने इमारतीचे निर्लेखन करावे आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास जिल्हा परिषदेने परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जि. प. ला सादर केला होता. त्याला मंजुरी देण्याचा विषय जि. प. सर्वसाधारण सभेत आला असता शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्या ठिकाणी 23 पैकी दोन गुंठय़ातच इमारत आहे. त्यामुळे इमारत ठेवून इतर जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी सूचना सत्ताधारी गटनेते रणजित देसाई यांनी मांडली. मात्र व शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी चांगले शिवस्मारक उभे राहणार आहे. तेव्हा विरोध करू नका, असे सांगताच आम्ही विरोध करीतच नाही, असे देसाई यांनी सांगितले आणि शिवाजी महाराज पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. परंतु घाईगडबडीत निर्णय न घेता कणकवली सभापती, कणकवली नगराध्यक्ष यांना सोबत घेऊन बांधकाम विभागाने तात्काळ वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा व पुढील सभेत हा अहवाल ठेवल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांना कारवाईची नोटीस
जिल्हा नियोजनमधून जिल्हय़ातील हेत, इळये, कासार्डे, पडवे आणि मळेवाड या प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या. 80 लाखाचा निधीही मंजूर आहे. परंतु प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविल्याने फेरनिविदा काढण्याचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देत असतानाच निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविल्याने प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची नोटीस काढण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले. विज्ञान प्रयोगशाळेचा 80 लाखाचा निधी अखर्चित राहिल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे सभागृहात ठरविण्यात आले.
परसबाग कुक्कुटपालन योजनेला मंजुरी
पशुसंवर्धन विभागामार्फत परस बाग कुक्कुटपालन या नव्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेमध्ये जिल्हय़ातील 100 महिला बचतगटांना 16 आठवडय़ाची, अंडी देणारी कोंबडी दिली जाणार आहेत व त्यांच्याकडील अंडी अंगणवाडीमधील बालकांना दिली जाणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.