पुढील आदेश आल्यानंतर संबंधित परीक्षांच्या तारखा जाहीर होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्रातील विद्यापीठ अधिविभाग व महाविद्यालयीन सर्व परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशनुसार ६ ते १२ एप्रिल दरम्यानच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. याची दखल अधिविभाग, महाविद्यालय, विद्यार्थी, पालक यांनी घ्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बीए, बीकॉम, बीएस्सी, इंजिनीअरिंग, फार्मसी, बी टेक, बीएस्सी आयटी, बी व्होक, क्लस्टर पद्धतीने विधी विभाग, महाविद्यालय पातळीवर प्रथम वर्षाच्या परीक्षा यासह आदी विषयांच्या परीक्षा २२ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. या परीक्षांना १ लाख २० हजार विद्यार्थी बसले होते. आत्तापर्यंत २५ विषयांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. सध्या बीए, बीकॉम , बीएस्सी, द्वितीय वर्ष आणि एमएम, एमकॉम, एम एस्सी अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. परंतु कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत.
पुढे ढकलण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुढील शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता, परीक्षेच्या माहिती संदर्भात विद्यार्थ्यांनी वारंवार विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी , असे आव्हान परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक पळसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी बंद
जिल्हा आपत्ती विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा , महाविद्यालय आणि खाजगी शिकवण्या३० एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत , अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी प्रसिद्ध केली आहे.