प्रतिनिधी / कोल्हापूर
चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला व पुरुष संघांने देशभरातील विद्यापीठ संघांना भारी पडत वेगळा ठसा उमटवला. गेली चार महिने केलेला सराव पणाला लावत पुरुष संघाने 1 रौप्य व 1 कांस्य तर महिलांना संघाने 1 कांस्य पदक पटकावले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी व पंजाब युनिव्हर्सिटी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चंदीगडमधील सुखना तलावात ही स्पर्धा झाली.
इचलकरंजी येथे झालेल्या आंतरविभागीय कयाकिंग स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा मिळून शिवाजी विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ तयार केला होता. या संघांनी चंदीगडमधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाची मान अभिमानाने उंचावले, अशी कामगिरी केली. पुरुषांच्या संघाने 200 मीटर के-टू या प्रकारात (एका बोटीत दोन खेळाडू) रौप्य तर 200 मीटर के-फोर (एका बोटीत चार खेळाडू) या प्रकारात कांस्य पदक मिळवून आपला दबदबा निर्माण केला. महिला संघानेही पुरुष संघाच्या पावला पाऊल टाकत 200 मीटर के-फोर या प्रकारात कांस्य पदक मिळवले.
पदक विजेत्या के-टू पुरुष संघात करण घुनके व पवन कोळी तर के-टू संघात दर्शन पोवार, श्रेयांश पाटील, करण घुणके व कौस्तूभ पोकार्डे आदींचा समावेश होता. पुरुष संघातील सर्व जण इचलकरंजीतील दत्ताजीराव कदम आर्टस्, कॉमर्स ऍण्ड सायन्स (डीकेएसी) कॉलेजचे विद्यार्थी आहेत. शालिनी पिष्टे (डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज), राजनंदिनी पाटील (केआयटी कॉलेज), निकिता पिष्टे (डी. आर. माने कॉलेज) व श्रीवणी हाळीजवाळे (विवेकानंद कॉलेज) अशी कांस्य पदक विजेत्या के-फोर संघातील मुलींची नावे आहेत. या सर्व यशस्वी खेळाडूंना कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र- कुलगुरु डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक व आजरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.