साखरपुडय़ाची अभिनेत्रीने केली घोषणा
छोटय़ा पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतून घरोघरी पोहोचलेला अभिनेता विराजस कुलकर्णीने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
शिवानीने इन्स्टाग्राम अकौंटवरून विराजस सोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात शिवानी तिची अंगठी दाखवत आहे. तिने शेअर केलेल्या छायाचित्रावर कॉमेंट करत चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील काही काळापासून दोघे प्रेमाच्या नात्यात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोघेही सोशल मीडियावर परस्परांची छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत होते. नवीन वर्ष सुरू होताच त्यांनी साखरपुडा केला आहे.
शिवानीने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तर विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तो उत्तम लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे.