वार्ताहर /किणये
वाघवडे गावातील शिवारातील रस्त्यासाठी शेतकऱयांनी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणी व श्रमदानातून तार शिवारातील रस्ता करण्यात आला आहे. एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील व उद्योजक जोतिबा आंबोळकर यांच्या पुढाकारातून हा रस्ता करण्यात आला.
वाघवडे गावातील तार शिवारातील रस्ता पावसाळय़ात पाणी येऊन मोठय़ा प्रमाणात वाहून गेला होता. शेतात जाण्यासाठी रस्ता हवाच. त्यामुळे गावातील शेतकऱयांनी धाडसी निर्णय घेतला. रस्ता करण्यासाठी शेतकरी एकवटले आणि सरकारी अनुदानाची वाट न पाहता 1 लाख 50 हजार रुपये लोकवर्गणीतून जमा केले. जेसीबी, टिप्पर, ट्रक्टरच्या साहाय्याने व श्रमदानातून रस्ता
केला. रस्ता बनविण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला. सुमारे 500 ब्रास हार्ड मुरुम टाकून रस्ता मजबूत केला आहे. दयानंद देसाई, रवळू काकतकर, सोमनाथ परीट, नितीन गोडसे, सारंग देसाई, एम. टी. आंबोळकर, गंगाधर पाटील व शेतकरी उपस्थित होते.