वृत्त संस्था/ बेलग्रेड
येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे मुष्टियोद्धे शिवा थापा आणि दीपक बोरिया यांनी आपल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. थापाने दुसऱया फेरीत तर दीपकने उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
पुरूषांच्या 63.5 किलो गटातील झालेल्या लढतीत शिवा थापाने केनियाच्या निडेराचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. थापाने यापूर्वी आशियाई स्पर्धेत पाचवेळा पदक पटकाविले आहे. 2015 साली झालेल्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत थापाने कांस्य मिळविले होते. थापाचा पुढील फेरीतील सामना 30 ऑक्टोबरला जॉन ब्राऊनशी होणार आहे.
पुरूषांच्या 51 किलो वजनगटातील झालेल्या लढतीत भारताच्या दीपक बोरियाने किर्जीस्तानच्या युसेनालिव्हचा 5-0 असा पराभव करत शेवटच्या 16 स्पर्धकामध्ये स्थान मिळविले. 67 किलो वजनगटात भारताच्या आकाश संगवानने दुसरी फेरीत स्थान मिळविताना तुर्कीच्या अदेमवर 5-0 अशा गुणांनी मात केली. 57 किलो वजनगटात भारताच्या रोहित मोरने इक्वेडोरच्या कॅसेडोवर 5-0 असा विजय मिळवीत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेत 100 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याला एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स तर दोन्ही कांस्य विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.