प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील शिव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र गैरसोयींच्या गर्तेत अडकले असून सुविधांअभावी रूग्णांची हेळसांड सुरू आहे. या ठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकारी केवळ नावापुरतेच उरले असून लाखो रूपये खर्चून उभारलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील शोभेचे बाहुलेच बनले आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 17 गावातील 21 हजाराहून अधिकजणांना रूग्णसेवा देण्यात येते. रूग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची वानवाच आहे. उपचारासाठी येणाऱया रूग्णांना बसण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने रूग्णांना बाहेरच बसावे लागत आहे. पाण्याचाही थांगपत्ता नाही. रूग्णालयातील बेडचीही दुरवस्था झाली असून त्यावर चादरदेखील नसल्याने गंभीर आजार असलेल्या रूग्णांची गैरसोय होत आहे.
रूग्णालयात दोन एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या वैद्यकीय अधिकाऱयांच्या अनियमितपणामुळे उपचारासाठी येणाऱया रूग्णांना तिष्ठत बसावे लागत आहे. ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील नानाविध समस्यांचा पाढा प्रशासनाकडे वाचूनही अद्याप ही बाब प्रशासनाने गंभीरपणे न घेतल्याने रूग्णांची सुरू असलेली हेळसांड कायमच आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना सेवाच मिळत नसल्याने आर्थिक भूर्दंड सहन करत उपचारासाठी शहर गाठावे लागत आहे.
1985 मध्ये बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे 17 गावातील रूग्णांना लाभ होत होता. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आले. देखभालीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. परिसरातील ग्रामस्थांच्या रेटय़ानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाला सवड मिळाल्यानंतर केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र 8 ते 9 महिन्यांपासून हे कामही पूर्णतः ठप्प आहे. यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र नावापुरतेच उरले आहे. आरोग्य प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून सोयीसुविधांच्या उपलब्धतेबरोबरच रखडलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.