बाळाचा जन्मल्याबरोबर प्रथम त्याची नाळ कापतात. यावेळी खूप काळजी घेणे आवश्यक असते. नाळेवर हळद-कुंकू, बुक्का, राख पावडर असं काहीही लावू नये. साधारणपणे 6-7 दिवसांनी नाळ पडते. पहिले 3-4 दिवस त्यातून स्त्राव येतो. त्यामुळे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
बाळ जन्मत:च रडले पाहिजे. म्हणजे त्याची श्वास घेण्याची क्रिया सुरु झाल्याचे लक्षात येते. जन्मल्याबरोबर बाळ रडले नाही तर प्रथम बाळाचे पाय हातात धरून उलटे करावे. बाळाच्या नाकातोंडात गेलेले पाणी बाहेर काढावे. तोंड आतून स्वच्छ करावे. स्वच्छ करताना करंगळीला निर्जंतुक जाळीदार कापड गुंडाळावे व हळुवारपणे पुसून तोंडातील चिकट पदार्थ बाहेर काढावा. तळपायावर टिचकी मारून पहावं. एवढय़ा प्रयत्नाने ते रडू लागले नाही तर त्याला हळूहळू तोंडात फुंकर मारून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. तातडीने डॉक्टरांना बोलवावे.
बाळ जन्मल्या बरोबर बाळाचे लिंग व्यवस्थित आहे की नाही ते पाहणे गरजेचे आहे.
बाळाच्या शरीरात कुठे व्यंग असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
अन्न नलिका बंद असल्यास तोंडास फेस येतो.
संडासची जागा उघडी आहे की नाही ते पहावे.
नाक, कान, तोंड व पूर्ण शरीर हे निर्जंतूक कापसाच्या बोळय़ाने पुसून घ्यावे.
जन्मत: बाळाचं वजन निदान अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होते, आणि 1 वर्षाने तिप्पट होते. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
बाळंतपण 37 आठवडय़ांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱया दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन 2 किलो पेक्षाही कमी असते. उंची 18 इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणे गरजेच असते.
वजन कमी असल्यास सतत आईच्या जवळ नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्मयावर टोपी घालावी. आईने बाळाला दर दोन तासांनी नीट काळजीने स्तनपान करावे. बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान करू शकत नाही. तसेच त्याला कमीत कमी हाताळावे व धुळीपासून रक्षण करावे.
काही बाळांना जन्मल्यावर तिसऱया दिवशी कावीळ होते व 5-6 दिवसांनी ती कमी होते किंवा आपोआप नाहीशी होते. आईच्या रक्तपेशी बाळाच्या रक्तात असतात. त्यांचा नाश झाल्यामुळे कावीळ होते. त्याबद्दल फारशी काळजी करू नये. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते. पण जन्मल्यानंतर लगेच कावीळ दिसल्यास किंवा 7-8 दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकल्यास मात्र डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.
पहिल्या 12 तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी 3-4 दिवस होते. एक संपूर्ण दिवस बाळाला शी झाली नाही तर काही व्यंग आहे का ते पहावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतेक मुले एक-दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे.
डोस व लसीकरण
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा अत्यंत सोपा मार्ग आहे. 1 वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. गोवरच्या लसीबरोबर ‘अ’ जीवनसत्त्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे.
एक वर्षाच्या आत क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक डोस, गोवर लस देणे गरजेचे आहे. रक्त काविळीची लस पहिल्या दहा दिवसात देतात. क्षयरोग प्रतिबंधक लसीला बी.सी.जी. म्हणतात. ती डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. जन्मानंतर लगेच दुसऱया दिवशीसुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. 15 दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्याठिकाणी थोडासा व्रण एक ते दिड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील 3-4 महिन्यात कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. दीड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा द्यावा.
बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलिओ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलिओपासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षाने आणखी एक बूस्टर डोस द्यावा लागतो व पाचव्या वषी पुन्हा एक बूस्टर डोस द्यावा लागतो.
गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस बाळाला 9 ते 12 महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते. सहा महिने ते 3 वर्ष या वयात ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळतो. म्हणून या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजावेत व तसेच त्याच्या आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्या असे पदार्थही असावेत.
बाळाला सर्दी, खोकला, ताप किंवा अतिसार असला तरी बाळाचे लसीकरण किरकोळ आजारात पुढे ढकलू नये. जर बाळ कुपोषित असले तर निरनिराळय़ा आजारांना बळी पडू शकते.