वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या एका 26 वर्षीय शीख नौसैनिक अधिकाऱयाला काही बंधनांसह पगडी परिधान करण्याची अनुमती देण्यात आली आहे. या नौदलाच्या 246 वर्षांच्या इतिहासात अशी अनुमती मिळविणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे. सुमारे 5 वर्षापासून दररोज सकाळी लेफ्टनंट सुखबीर तूर अमेरिकन नौसैनिक कोराचा गणवेश परिधान करत आले आहेत.
अखेर माझी श्रद्धा आणि देशापैकी कुणा एकाची निवड करण्याची माझ्यावर वेळ आली नाही. मी जसा आहे तसाच राहून दोन्हींचा सन्मान करत असल्याचे तूर यांनी म्हटले आहे. तूर यांनी हा अधिकार प्राप्त करण्यासाठी मोठा लढा दिला आहे. यंदा बढती मिळविल्यावर कॅप्टन झाले असताना त्यांनी पगडी परिधान करण्याच्या अनुमतीसाठी दाद मागण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्ट आणि ओहायोत वास्तव्य राहिलेल्या भारतीय स्थलांतरिताचे पुत्र असलेल्या तूर यांना काही बंधनांसह कर्तव्य बजावताना पगडी परिधान करण्याची अनुमती मिळाली आहे.
तूर यांनी आता मरीन कोर कमांडेंटच्या प्रतिबंधात्मक निर्णयाच्या विरोधात दाद मागितली आहे. सर्वच ठिकाणी पगडी परिधान करण्याची अनुमती न मिळाल्यास कोरच्या विरोधात खटला दाखल करणार असल्याचे तूर यांचे म्हणणे आहे.