सर्व आरोग्य केंद्रामध्ये बाधितांची वाढती संख्या : महामारीतही लग्ने, पाटर्य़ा सुरुच : एकत्रित रुग्ण सापडण्याचे प्रकार अधिक
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचा गोव्यातील कहर दिवसेंदिवस वाढतच असून काल शुक्रवारी 333 नवे रुग्ण सापडले तर चार जाणांचा बळी गेला. काल 142 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. सध्या 2282 सक्रिय रुग्ण असून कोरोनाबाधितांची आतापर्यंत एकूण संख्या 7947 झाली आहे. आतापर्यंत 5595 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारचे चार मृत्यू मिळून एकूण मृतांचा आकडा 70 झाला आहे. शुक्रवारी झालेल्या मृतांमध्ये कुडणे-डिचोली येथील 30 वर्षीय तरुणाचा समावेश असून गेल्या रविवारीच त्याचे लग्न झाले होते.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार 1302 जणांचे अहवाल प्रलंबित असून 67 जणांना संशयित म्हणून गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती करण्यात आले आहे. विविध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये 44 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शुक्रवारी विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 14 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना विविध कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे तर 4 प्रवाशांना होम क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्या खात्याने दिली आहे.
वाढत्या फैलवाने जनता झालीय भयभीत
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून रुग्ण कमी होण्याचा शक्यता दिसून येत नाही. अनेक रुग्ण कोरोनामुक्त होत असले तरी बाधितांची संख्या वाढत आहे. मृतांची संख्याही वाढत असल्याने जनता भयभीत झाली आहे. सरकार मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
आरोग्य केंद्रामध्ये वाढती संख्या
विविध आरोग्य केंद्रांमध्ये नोंदणी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुढिलप्रमाणे ः डिचोली 22, सांखळी 55, पेडणे 48, वाळपई 81, म्हपसा 81, पणजी 85, हळदोणा 21, बेतकी 16, कांदोळी 58, कासारवर्णे 9, कोलवाळ 51, खोर्ली 63, चिंबल 108, शिवोली 23, पर्वरी 51, मये 23, कुडचडे 36, काणकोण 21, मडगाव 158, वास्को 377, बाळ्ळी 49, कासावली 40, चिंचिणी 4, कुठ्ठाळी 327, कुडतरी 61, लोटली 33, मडकई 36, केपे 38, सांगे 39, शिरोडा 28, धारबांदोडा 49, फोंडा 127, नावेली 50
शुक्रवारी चौघांचा बळी
शुक्रवारी वास्कोतील 78 वर्षीय पुरुष रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये मृत झाला. म्हापसा येथील 62 वर्षीय रुग्णाला मृतावस्थेतच उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात आणले होते. वास्कोतील 80 वर्षाच्या रुग्णाचा व कुडणेतील 30 वर्षीय युवकाचा गोमेकॉत मृत्यू झाला. या सर्वांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते कोरोनाचे बळी ठरले आहेत.
गोव्यातील परिस्थिती कोरोनाच्या थैमानामुळे बिघडली असून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कोण केव्हा पॉझिटिव्ह होईल आणि मृत्यूला कवटाळेल ते सांगता येत नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्याने लोक घबरले आहेत.
- गोव्यात 7 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित 7947
- आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 5595
- उपचार घेणारे सक्रीय रुग्ण 2282
- 7 ऑगस्टचे नवीन रुग्ण 333
- 7 ऑगस्टला बरे झालेले रुग्ण 142
- 7 ऑगस्टचे मृत्यू 4
- आतापर्यंतचे एकूण मृत्यू 70