क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
शुभम तारीच्या भेदक वेगवान गोलंदाजीमुळे (42 धावात 5 विकेट्स) गोव्याने हिमाचलप्रदेशचा पहिला डाव 193 धावात गुंडाळला. 25 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू स्पर्धेतील चार दिवशीय लढतीला कालपासून बेंगलोरच्या अलूर क्रिकेट स्टेडियमवर सुरूवात झाली. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा गोव्याने सावध फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 1 बाद 92 धावा केल्या होत्या. पहिलया डावातील आघाडी घेण्यापासून गोव्याला आणखी 101 धावांची आवश्यकता आहे.
हिमाचलप्रदेशने नाणेफेकीच्या अचूक कौलानंतर प्रथम फलंदाजी करणे पसंत केले होते. चांगल्या सुरूवातीनंतर हिमाचलप्रदेशचा डाव कोसळला. कुशल पाल आणि पुरब सिंग (35 धावा, 67 चेंडू, 6ƒ4) यांनी 41 धावांची सलामी दिली होती. प्रथम कुशलला शुभम तारीने पायचितच्या जाळय़ात अडकविल्यानंतर फिरकी गोलंदाज मोहित रेडकरने पुरब सिंग आणि वालिया याना झटपट बाद करून हिमाचलची स्थिती 3 बाद 83 अशी केली.
त्यानंतर शुभमने पुरोहित, राहुल चौहान, योगदीप ठाकूर व राघव बाली यांना 18 धावांच्या मोबदल्यात बाद करून हिमाचलची 7 बाद 107 अशी दयनीय अवस्था केली. हिमाचलच्या शेवटच्या तीन विकेट्सनी उपयुक्त 86 धावा जोडल्या. अरोराची (36 धावा, 53 चेंडू, 5ƒ4) चिवट खेळी विशंभर कॅहलोनने संपविली तर जयशोधन ठाकूर (32 धावा, 75 चेंडू, 5ƒ4) आणि एन. कंवर (30 धावा, 29 चेंडू, 2ƒ4, 2ƒ6) यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरल्याने हिमाचलप्रदेशला 200च्या आसपास जाता आले.
गोव्यासाठी शुभम तारीच्या 5 विकेट्सच्या व्यतिरिक्त मोहित रेडकरने 48 धावात 2, विशंभर कॅहलोनने 22 धावात 2 तर ऋत्विक नाईकने एक गडी बाद केला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा, गोव्याने सावध सुरूवात करताना वैभव गोवेकरला (36 धावा, 62 चेंडू, 5ƒ4) गमवून 32 षटकात 1 बाद 92 धावा केल्या होत्या. वैभव आणि मंथन खुटकरने 75 धावांची सलामी दिली. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा मंथन खुटकर (नाबाद 42 धावा, 94 चेंडू, 6ƒ4) आणि कश्यप बखले (12 धावा) नाबाद खेळत होते. हिमाचलसाठी एक विकेट रितीककुमारने घेतली.
संक्षिप्त धावफलकः हिमाचलप्रदेश, पहिला डाव, 57.2 षटकात सर्वबाद 193 (कुशल पाल 12, पुरब सिंग 35, एस. आर. पुरोहित 31, ए. वालिया 5, एस. अरोरा 36, राहुल चौहान 0, योगदीप ठाकूर 1, राघव बाली 8, जयशोधन ठाकूर 32, एन. कंवर नाबाद 30, रितीककुमार 0, अवांतर 3 धावा. गोलंदाजीः ऋत्विक नाईक 16.2-3-48-1, शुभम तारी 11.5-3-42-5, मोहित रेडकर 12-2-48-2, दीपराज गावकर 12.1-3-31-0, विशंभर कॅहलोन 5-0-22-2), गोवा, पहिला डाव 32 षटकात 1 बाद 92 (वैभव गोवेकर 36, मंथन खुटकर नाबाद 42, कश्यप बखले नाबाद 12 धावा. रितीककुमार 1-19).