कंग्राळी बुद्रुक येथे प्रचारसभा : समितीच्या सिंहाला विजयी करण्याचा निर्धार : राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना बळी न पडता शेळकेंना निवडून द्या
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
लोकसभा पोटनिवडणुकीचे मध्यवर्ती म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांची प्रचारसभा कंग्राळी बुद्रुक येथे घेण्यात आली. समितीच्या या सिंहाला विजयी करण्यासाठी आता महिलांनीही मोठय़ा संख्येने प्रचारात सहभाग घेतला आहे. म. ए. समितीच्या शेळके यांना दिल्लीत सीमाप्रश्नाचा आवाज उठविण्यासाठी पाठवून देण्याचा निर्धार महिला व कार्यकर्त्यांनी केला आहे.
बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील आवारात ही सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे कार्यकर्ते आनंद पाटील होते. कंग्राळी बुद्रुक गाव समितीचा बालेकिल्ला आहे. कर्नाटक सरकार गेली अनेक वर्षे मराठी माणसांवर या-ना-त्या कारणाने अन्याय करत आहे. आपली मराठी संस्कृती, भाषा व आपली मराठी मायबोली टिकविण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळय़ासमोर ठेऊन मराठी आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसभा पोटनिवडणुकीचे मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळकेंना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर उमेदवार शुभम शेळके, ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, संतोष मंडलिक, कृष्णा हुंदरे, कल्लाप्पा घाटेगस्ती, महादेव पाटील, प्रकाश मरगाळे ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील, तानाजी पाटील, नवनाथ पुजारी, ग्रा. पं. सदस्या वंदना चव्हाण, भारता पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन उमेदवार शुभम शेळके यांच्या हस्ते करून सभेला प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकमध्ये म. ए. समिती कार्यकर्ते मदन बामणे यांनी सभेचा उद्देश सांगितला. यानंतर उमेदवार शुभम शेळकेंसह इतर मान्यवरांचे कंग्राळी ग्रामस्थांच्यावतीने हार घालून स्वागत करण्यात आले.
शासनाला जाणीव करून देणार
माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, मराठी भाषिकांच्या एकीची ताकद दाखविण्यासाठी शुभम शेळकेंना भरघोस मतांनी विजयी करा, असे सांगितले. मालोजी अष्टेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही सर्व हिंदू म्हणून जगत आहोत. परंतु शिवाजी महाराजांचा विसर पडलेल्या शासनाला त्याची जाणिव करून देण्यासाठी शुभम शेळकेंना भरघोस मतांनी विजयी करा, असे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायतीच्यावतीने ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील यांनी शुभम शेळकेंना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. ऍड सुधीर चव्हाण यांनी कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने शुभम शेळकेंना पाठिंबा व्यक्त करून राष्ट्रीय पक्षांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळकेंना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
मराठी संस्कृतीचे संरक्षण करा
उमेदवार शुभम शेळके यांनी, आपली मराठी मायबोली टिकविण्यासाठी शासनाकडून मराठी माणसावर या-ना-त्या कारणाने होणारा अन्याय दूर करण्यासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करून दिल्लीला पाठवून मराठी संस्कृतीचे संरक्षण करण्याची संधी देण्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी साई कॉलनीतील महालक्ष्मी महिला मंडळाच्यावतीने शुभम शेळके यांचा सत्कार करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेला कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर, साई कॉलनी, कंग्राळी खुर्द भागातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांसह असंख्य मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.